Join us

Pune Flood : पानशेत, खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू! पुणेकरांसाठी सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:04 PM

Pune Rain and Flood Updates : घाट परिसरात पावसाची संततधार सुरू असून पानशेत आणि खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Pune Rain and Flood Updates :  सह्याद्री घाटमाथ्यावर चांगलाच पाऊस पडताना दिसत असून पानशेत आणि खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तर पाटबंधारे विभागाने मुठा नदीकाठी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर नदीपात्रात असलेल्या वस्तू आणि जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अती पर्जन्यमानामुळे पानशेत धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग वाढवून रात्री १० वाजता ७ हजार ६८८  क्यूसेक करण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग  कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. तर नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत अशा इशारा दिला आहे.

त्याचबरोबर खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग आज (२८ जुलै आणि २९ जुलैच्या मध्यरात्री) रात्री १२ वाजता वाढवून १३  हजार ९८१ क्यूसेक करण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग  कमी/जास्त करण्याची शक्यता आहे असा इशारा मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी दिला आहे.

दरम्यान, २५ जुलैच्या पहाटे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे मुठा नदीकाठी पुणे शहरात असणाऱ्या इमारतींमध्ये आणि लोकवस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले असून काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.

टॅग्स :हवामानपुणेपाऊसमोसमी पाऊसपूर