Pune Latest Rain Updates : राज्यात पावसाचा जोर वाढल्याचं दिसत असून कोकण आणि पश्चिम घाटात मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भातील पूर्वेच्या जिल्ह्यातही चांगला पाऊस पडत आहे. परंतु मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. तर पुण्यात पुढील पाच दिवसांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे.
मागील आठवड्याचे हवामान
पुणे परिसरात मागील आठवड्यात कमाल तापमान २५.५ ते २९.२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.९ ते २३.५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ८७ टक्के होती. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ४.६ ते ६.८ किमी होता.
हवामानाचा अंदाज
पुढील पाच दिवसांत पुणे जिल्ह्यात कामल तापमान २८ ते ३१ सेल्सिअस तर किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७८ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी २६ ते ३१ किमी दरम्यान राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुण्यात किती पडणार पाऊस?
पुणे जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी आहे. येणाऱ्या पाच दिवसामध्ये जवळपास १७० मिमी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २४ जुलै रोजी ३५ मिमी, २५ जुलै रोजी ४० मिमी, २६ जुलै रोजी ३८ मिमी, २७ जुलै रोजी ३० मिमी, २८ जुलै रोजी २५ मिमी पावसाची शक्यता आहे.