पुणे: मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला असून सध्या या पावसाने जवळपास अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. तर आज दक्षिणेकडून आलेल्या पावसाने मुंबई गाठली आहे. तर आज पुण्यातही रात्री ९ वाजता पावसाने हजेरी लावली आहे. काल आलेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली होती.
दरम्यान, आज रात्री ९च्या दरम्यान जोरदार पावसाला सुरूवात झाली असून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरात आणि उपनगर भागांत पावसाने हजेरी लावली आहे. काल अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. अनेक ठिकाणी तीन ते चार फुटापर्यंत पाणी आल्यामुळे गाड्या बुडाल्याचे चित्र होते.
मान्सूनच्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून शेतकऱ्यांनी खरिपाच्या कामाची लगबग वाढवली आहे. पुणे आणि घाट परिसरामध्ये शेतकरी भाताचे रोप पेरण्याच्या तयारीला लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी रोपे टाकण्यासाठी शेत तयार केले आहे. तर जे शेतकरी सोयाबीनची लागवड करतात अशा शेतकऱ्यांनी बियाणेही खरेदी केले आहे.
मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये
मान्सूनच्या पावसामध्ये पुढील चार ते पाच दिवसानंतर खंड पडण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ज्यावेळी जमिनीत पुरेसी ओल असेल आणि पावसाचा खंड झाला तरी दुबार पेरण्याची वेळ येणार नाही अशा वेळेस शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात असा सल्ला देण्यात आला आहे.