राज्यात तीव्र पाणीटंचाईने मान वर केली आहे. तापमानाचा पारा चढताच असल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी धरणसाठा वेगाने खालावताना दिसत आहे.
पुणे विभागात सध्या केवळ २७.८३ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक असून लघू,मध्यम व मोठ्या धरणांमध्ये आता ४२३० दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे. मागील वर्षी याच दरम्यान पुण्यातील धरणसाठ्यामध्ये ३४.७१ टक्के पाणी शिल्लक होते.
भाटघर धरणात १०.४७ टक्के
सर्वाधिक जलक्षमता असणारे भाटघर धरण आता १०.४७ टक्क्यांवर येऊन ठेपले आहे. म्हणजेच या धरणात आता केवळ २.४६ टीएमसी जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
नीरा देवघर, डिंभेमध्ये एवढा साठा
नीरा देवघर धरणात आज ४७.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून डिंभे धरण २३.३४ टक्क्यांवर पोहोचले आहे. मागील वर्षीच्या तूलनेत डिंभे धरणात ९.९८ टक्क्यांची जलतूट आहे.
चाकसमान, पवना. खडकवासला किती?
२१४.५० दलघमी म्हणजेच ७ टीएमसी उपयुक्त प्रकल्पीय पाणीसाठा एवढी तरतूद असणाऱ्या चाकसमान धरणात १९.४० टक्के पाणी शिल्लक आहे. पवना धरणात ३१.७० टक्के तर खडकवासला धरणात५३.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पानशेत, मुळशीटाटा धरणात..
पानशेत धरणात आता ३०.२९ टक्के पाणी शिल्लक असून मुळशीटाटा धरणात ३३.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मराठवाड्यासह पुणे व नाशिक विभागातील पाणीसाठा वेगाने घटत असून तापमानासह पाणीटंचाईच्या झळाही तीव्र होण्याची चिन्हे आहेत.