Pune Rain : पुणे परिसरात मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर सर्वाधिक पाऊस झाला असून दरडी कोसळल्या आहेत. तर ताम्हिणी घाटातील रायगड पुणे रस्त्यावरही दरडी कोसळल्या असून हा रस्त्या काही वेळासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणातील अनेक भागांत मागच्या २४ तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील लवासा येथे मागील २४ तासांत सर्वाधिक पाऊस पडला असून येथे दरडी कोसळल्या आहेत. तर जोरदार पावसामुळे कोसळलेल्या दरडीमध्यो दोन व्हिला गाडल्याची माहिती समोर आली आहे.
आज (दि. २५) रोजी सकाळपर्यंत मागील २४ तासांमध्ये लवासा येथे सर्वाधिक पावसाने हजेरी लावली असून येथे तब्बल ५४३ मिमी पाऊस पडला आहे. त्यापाठोपाठ लोणावळा येथे ३२२, निमगिरी येथे २३२ मिमी, माळीण येथे १८० मिमी आणि पिंपरी येथे १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पुणे शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे.
पुण्यातील मुळा, मुठा, पवना या नद्यांमध्ये वरील धरणातून विसर्ग सुरू केल्यामुळे अचानक पाणी वाढले. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे पुणे शहरातील नदीकाढच्या इमारतींमध्ये पाणी घुसले होते. सुरक्षा पथकांनी काही नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलवले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.