Join us

Rabi Crop Require Water : पश्चिम विदर्भातील धरणे भरली; रब्बीसाठी आता मुबलक जलसाठा उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:56 AM

पश्चिम विदर्भातील ३६ मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पापैकी २७ प्रकल्पांचा साठा शंभर टक्क्यावर पोहोचला आहे. त्यामुळे रब्बी पिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. (Rabi Crop Require Water)

Rabi Crop Require Water : राजरत्न सिरसाट / अकोला : 

पश्चिम विदर्भातील ३६ मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पापैकी २७ प्रकल्पांचा साठा शंभर टक्क्यावर पोहोचला असून, यातील १९ सिंचन प्रकल्पातून विसर्ग होत आहे मध्यम, मोठे व एकूण २५३ लघु प्रकल्प मिळून सद्या ९२.४४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

यामुळे यावर्षी विभागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने पाठ फिरवली होती त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली होती, परंतु, जुलै महिन्याअखेर पावसाने सुरुवात केली ती आतापर्यंत सुरू आहे.

यामुळे अपवाद दोन-चार मध्यम प्रकल्प वगळता सर्वच प्रकल्पाचा जलसाठा शंभर टक्क्यांवर पोहोचला आहे. या नऊ मोठ्या प्रकल्पातील अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा ओव्हर फ्लो असून, १४ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता प्राप्त अहवालानुसार या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू होता.

बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या प्रकल्पांची वक्रद्वार उघडले असून, यातून विसर्ग सुरू होता. यवतमाळ जिल्ह्यातील पूस व अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. 

वाण प्रकल्पात ९८.४४ टक्के, बेंबळा प्रकल्पात ९३.३८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. २७ मध्यम प्रकल्पांपैकी २१ प्रकल्पांचा जलसाठा शंभर टक्क्यांवर असून, यातील अमरावती जिल्ह्यातील शहानूर, चंद्रभागा या प्रकल्पांतून विसर्ग सुरू होता. 

यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूर, गोकी, वाघाडी, बोरगाव, अकोला जिल्ह्यातील मोर्णा, उमा, वाशिम जिल्ह्यातील अडाण व सोनल, बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा, पलढग, मस, मन व तोरणा या मध्यम प्रकल्पातून विसर्ग सुरू होता. सपन, पूर्णा, सायखेडा, नवरगाव, निर्गुणा, एकबुर्जी, तोरणा या प्रकल्पात १०० टक्के जलसाठा शिल्लक आहे.

प्रकल्पातील जलसाठा

प्रकल्पजलसाठा (टक्के)
मोठ्या प्रकल्पात९८.८४ टक्के
मध्यम प्रकल्पात८८.०३ टक्के
लघु  प्रकल्पात८६.४७ टक्के
एकूण  ९२.४४ टक्के
टॅग्स :शेती क्षेत्रधरणविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४विदर्भरब्बीपीक