Join us

पावसामुळे रब्बी पिकांना मिळणार जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 11:39 AM

जोरदार झालेल्या पावसामुळे ऊसतोड थांबली असून, साखर कारखान्यांचे गाळप ठप्प झाले आहे. रब्बी पिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. पलूस, तासगाव, खानापूर, मिरज तालुक्यात द्राक्ष, तर आटपाडी, जत तालुक्यात डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसाने बुधवारी सकाळी सांगली जिल्ह्याला झोडपून काढले. दुष्काळी तालुक्यासह वाळवा, शिराळा, पलूस, मिरज तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. जोरदार झालेल्या पावसामुळे ऊसतोड थांबली असून, साखर कारखान्यांचे गाळप ठप्प झाले आहे. रब्बी पिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. पलूस, तासगाव, खानापूर, मिरज तालुक्यात द्राक्ष, तर आटपाडी, जत तालुक्यात डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. सकाळी आठनंतर पावसाचा जोर वाढत गेला. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर या दुष्काळी तालुक्यात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार हजेरीकणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे भातशेती आडवी होऊन नुकसान झाले आहे. रत्नागिरीत कोसळलेल्या पावसाने काही काळ उकाड्यापासून दिलासा दिला.

माणमध्ये जोरदार वृष्टीसाताऱ्याबरोबरच कऱ्हाड, माण तालुक्यातही बुधवारी पहाटेपासून जोरदार पाऊस पडला. याचा फायदा ज्वारीला झाला असला तरी पीक काढणीवर परिणाम झालेला आहे. या पावसाने द्राक्ष, डाळिंब बागांवर परिणाम होणार आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदअवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब बागांचे नुकसान होणार आहे; पण रब्बी पिकांना पोषक असा पाऊस असल्यामुळे दुष्काळाच्या चिंतेने नाराज शेतकऱ्यांच्या चेहयावर आनंद दिसत होता. रब्बी पिकांना जीवदानासह दुष्काळाची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल, अशाच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.

ओढे-नाले खळखळून वाहिलेअवकाळी पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत हजेरी लावल्यामुळे ग्रामीण भागातील ओढे-नाले खळखळून वाहत होते. परतीच्या पावसाने दडी मारल्यानंतर चिंतेत असलेला शेतकरी ओढे-नाले खळखळून वाहताना आनंदित झाला होता.

पुढील २ दिवस पाऊसदक्षिण भारतातील मान्सूनचा किंचित परिणाम म्हणून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पुढील दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना गुरुवार व शुक्रवारी पावसाचा इशारा आहे.

टॅग्स :हवामानपाऊसरब्बीपीकडाळिंबद्राक्षेसांगली