Join us

Radhanagri Dam : राधानगरीचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडले जोरदार पावसाने पाणी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 11:05 AM

बुधवार (दि.११) पर्यंत जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने पुढील तीन दिवस 'यलो अलर्ट' दिला आहे. रविवारी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले.

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर सरीवर सरी कोसळत राहिल्या. अधूनमधून पाऊस व्हायचा. मात्र, जोरदार कोसळत राहिल्याने पाणीपाणी करत होता.

बुधवार (दि.११) पर्यंत जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने पुढील तीन दिवस 'यलो अलर्ट' दिला आहे. रविवारी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले.

गणेशोत्सवाच्या काळात पाऊस थोडी उसंत घेईल, असे वाटत होते. शनिवारी गणेश आगमनादिवशी पावसाने उघडीप दिली, दिवसभर अक्षरशः खडखडीत ऊन राहिले. मात्र, रविवारी सकाळपासून हवामानात पुन्हा बदल झाला आणि पाऊस सुरू झाला. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या.

ऊन पडायचे, काही वेळानंतर आकाश भरून यायचे आणि पावसाला सुरुवात व्हायची. पाऊस सुरू झाला की किमान पंधरा ते वीस मिनिटे जोरदार कोसळत राहायचा. त्यामुळे पाणी पाणी व्हायचे.

धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाला आहे. राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, भुदरगड येथे तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. रविवारी रात्री आठ वाजता पंचगंगा नदीची पातळी २४ फुटावर होती. दिवसभरात पाणीपातळीत सुमारे फुटाने वाढ झाली.

दरम्यान, आजपासून तीन दिवस जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' दिला असून या कालावधीत मध्यम ते जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राधानगरी परिसरात संततधारगेल्या चार दिवसांपासून राधानगरी परिसरात सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे रविवारी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले. धरणाचा स्वयंचलित द्वार क्रमांक ६ हा दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी उघडला; तर द्वार क्र. ५ हा सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटानी उघडला.

पाणीपातळी ३४७ फूट असून, पाणीसाठा ८३२७ दशलक्ष घनफूट आहे. दोन्ही दरवाजांतून २८५६ क्युसेक विसर्ग चालू आहे; तर वीजनिर्मिती केंद्रातून १५०० क्युसेक असा एकूण ४३५६ क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.

१ जूनपासून आजअखेर एकूण पाऊस ५३४२ मि. मी. झाला आहे. चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे राधानगरीसह पश्चिम भागातील पोसवायला (कापणीला) आलेल्या भातपिकाचे चांगलेच नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग चितेत आहे. रविवारी दिवसभर चालू असणाऱ्या पावसाने राधानगरीच्या आठवडी बाजारात विक्रेत्यांसह ग्राहकांची चांगली तारांबळ उडाली.

टॅग्स :धरणपाणीपाऊसराधानगरीकोल्हापूरगणेशोत्सव 2024