Rain Alert for Maharashtra and Mumbai: पाण्याने भरलेले ढग हे एकाच ठिकाणी थांबतील, असे अनुमान करण्यात येत असले, तरी तो एक अंदाज असतो. हवामानाचा अंदाज बांधण्याकरिता आता पूर्वीपेक्षा अत्याधुनिक तंत्रप्रणाली उपलब्ध आहे. सॅटेलाइट, संगणक याच्या सहाय्याने शास्त्रज्ञ मंडळींचा अभ्यास अखंड सुरू असतो. परंतु, हवामानाचे ८० टक्के अंदाज खरे ठरतात. शुक्रवारचा रेड अलर्टचा (Red Alert for Rain) अंदाज प्रत्यक्षात उतरला नसेल, तर ती मानवी चूक आहे, असे मत सेवानिवृत्त सहायक हवामान तज्ज्ञ शशिकांत दाहोत्रे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
शुक्रवारी अतिमुसळधार पाऊस (Heavy Rain) पडणार असल्याचा रेड अलर्ट ठाणे, कल्याण भागाला दिला होता. प्रत्यक्षात गुरुवारच्या तुलनेत फारसा काहीच पाऊस पडला नाही. गुरुवारी सर्वत्र जिल्ह्यात पूरस्थिती होती, त्यामुळे आपत्कालीन विभाग तणावात होता. शुक्रवारी पाऊस थांबला होता काही वेळ सूर्यकिरणे पडली. त्यामुळे समाज माध्यमांवर हवामान विभागाची खिल्ली उडवली गेली. त्यावर दाहोत्रे म्हणाले की, किनारपट्टी भागात पाऊस पडला आहे, शहरात पावसाने उसंत घेतली असली, तरी संध्याकाळी ५ नंतर संपूर्ण आकाश ढगाळलेले होते, त्यामुळे पाऊस पडणार हे नक्की, हवामानाचे अंदाज खरे ठरताना एखादा दिवस इकडे-तिकडे होऊ शकतो.
हवेचा जोर जसा असतो, तसे ढग अन्यत्र सरकू शकतात. अनेकदा समुद्रकिनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हवामान विभागाची काम करण्याची पद्धत ही सध्या खूप प्रगत आहे. फार पूर्वी तालुक्याच्या एखाद्या शाळेकडून मदत घेऊन हवामाना संदर्भात अंदाज बांधले जायचे. पण आता तसे होत नाही. भरपूर चांगल्या तंत्रप्रणाली कार्यरत आहेत, त्यांद्वारे पावसाचा नेमका अंदाज घेऊन रेड, ऑरेंज, यलो अलर्ट देण्यात येतात. एकाच वेळी मुंबईसह देशभरातील हवामान विषयक शास्त्रज्ञ अनेक समीकरणे, वाऱ्याचा वेग, ढगांची हालचाल, एकूण आर्द्रता तपासून अंदाज वर्तवतात, असे दाहोत्रे यांनी सांगितले. पण तरीही शुक्रवारी झाली तशी मानवी चूक होऊ शकते. पाऊस पडलाच नाही तर हवामान तज्ज्ञ हताश न होता कार्यरत असतो.
त्रणा आपल्यापेक्षा हवामानाचे अधिक अचूक अंदाज व्यक्त करते. भारतात हवामानात जेवढे बदल होतात तेवढे तिकडे होत नाहीत, म्हणूनच ते कोणत्या वेळेला किती पाऊस पडेल हे नेमके सांगू शकतात. आपण नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर अंदाज बांधतो, अक्षांश आणि रेखांश याप्रमाणे सगळे आडाखे बांधतो. मात्र कुठे, किती, कसा, कधी पाऊस पडेल हे सांगता येणे एक आव्हान असते, असे दाहोत्रे म्हणाले.
अनेकदा पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात असे आपण म्हणतो. पण, ती स्थिती खालची झाली, एका स्तरावरून हवेचा जोर आणि दिशा बदलते, ती दिशा अनेकदा बरोबर उलटी म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेला असते, पण ते हवामान विभागाला कळते, सामान्यांना नाही, त्यामुळे नेमका पाऊस पडला का नाही किंवा का जास्त पडला हे सांगणे खूप क्लिष्ट असल्याचे दाहोत्रे यांनी सांगितले.
ग्लोबल वॉर्मिंगचे फटके आपल्याला बसू लागले आहेत. एकेकाळी शतकानंतर हवामानात होणारे बदल आता झपाट्याने होत आहेत. दक्षिण, उत्तर गोलार्धात बर्फ झपाट्याने वितळत असल्याने तापमानात बरेच चढउतार होत आहेत. त्या साऱ्याचा फटका संपूर्ण जगाला बसला असून, आपल्याकडे भविष्यात पाऊस पडेल, पण ऋतुमान राहणार नाही. गेल्या काही वर्षांत पाऊस ऑक्टोबर, नोव्हेंबर, जानेवारीमध्येही पडत आहे. ही ऋतुमान राहणार नसल्याचीच लक्षणे आहेत, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे.
मुंबई हवामानशास्त्र विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुळात पावसाचा अंदाज जो दिला आहे, तो शुक्रवारी सकाळी ८ ते शनिवारी सकाळी ८:३० यावेळेचा दिलेला असतो. काही ठिकाणी पाऊस झाला नसेल याचा अर्थ सरसकट पाऊस झाला नाही, असे म्हणता येत नाही. मुंबईसह देशभरातील हवामान शास्त्रज्ञ अनेक समीकरण मांडून अंदाज बांधतात. अहोरात्र अनेक तज्ज्ञ मंडळी कार्यरत असतात.