विदर्भाच्या पूर्व भागात विस्कळीत वाऱ्यांची स्थिती सक्रीय असल्याने आज पूर्व विदर्भ आणि खान्देशात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० प्रतितास राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे. अवकाळी पावसाचा जोर आता ओसरला असून पुढील तीन ते चार दिवस तापमान वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाण्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता कायम असून तापमान चढे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर,भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात यलो अलर्ट देण्यात आला असून पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेडमध्येही हलक्या सरींची शक्यता आहे.