वातावरणात बदल झाला असून, आगामी पाच दिवसांत धाराशिव जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीनसह विविध पिकांचे काड व केलेल्या राशी निवाऱ्याखाली ठेवण्याची गरज आहे. मंगळवारी दुपारनंतर अचानक आकाशात ढग निर्माण झाल्याने पावसाळी वातावरण निर्माण झाले होते.
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. १५ ते १६ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यातील तुरळक भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यंदा चार महिन्यांऐवजी पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ पावसाळी वातावरण राहिले होते. यामुळे ४ नोव्हेंबरपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनीत ओल होती. यामुळे रब्बीची पेरणी करता आली नाही. आठ दिवसांपासून जमिनीत वाफसा निर्माण झाल्याने रब्बीच्या पेरणीला वेग आला आहे.
मात्र, पुन्हा १५ ते १६ नोव्हेंबर दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे रब्बी पेरणीला पुन्हा ब्रेक लागणार असून, सुरुवातीला पेरणी केलेल्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही मुरमाड व वाफसा झालेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी ज्वारीसह हरभऱ्याची पेरणी केली आहे. त्या पिकांवर लष्कर अळी व शेंडा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
यंदा परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे अनेक दिवस शेतशिवारात पाणी साचून होते. त्यामुळे रबीच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. आता जिल्ह्याच्या विविध भागात पेरण्यांना वेग आला असून, त्यातच पुन्हा हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
तुरीवर होणार रोगांचा प्रादुर्भाव...
जिल्ह्यात खरीप हंगामात बहुतांश शेतकरी सोयाबीनमध्ये आंतर पीक म्हणून तूर पिकाची लागवड करतात. काही शेतकरी स्पेशल तुरीचे पीक घेतात. सध्या अनेक भागातील तुरीचे पीक फुलोऱ्यात आले आहे. मात्र, थंडी पडण्याऐवजी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे तुरीसह ज्वारी, हरभऱ्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी पाच दिवसांत जिल्ह्यातील काही भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी खरिपातील काड व राशी निवाऱ्याखाली ठेवाव्यात. रब्बीच्या पिकांवर रागाचा प्रादुर्भाव जाणवल्यास सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात. - एस.पी. जाधव, तालुका कृषी अधिकारी, धाराशिव.