Join us

Rain Alert : आज पासून चार दिवस मुसळधार; पुणे, साताऱ्याला रेड, नाशिक, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 10:00 AM

हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अनेक भागांत जोरदार पाऊस होत आहे.

शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट

रेड अलर्ट : पुणे, सातारा घाट माथा.

ऑरेंज अलर्ट :विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागात ऑरेंज अलर्ट आहे.

यलो अलर्ट : कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

कोल्हापुरात पूरस्थिती 'जैसे थे'

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती कायम आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने विसर्ग कायम आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ५७८४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेची पातळी ४२.१ फूट असून अद्याप ७४ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

प्रकल्प ओव्हरफ्लो, सतर्कतेचा इशारा

जुलै महिन्यात सलग २२ दिवस आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कायम असल्याने गोंदिया जिल्ह्यातील चार मध्यम आणि सात लघू प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. धरणाची पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी शनिवारी सकाळी पुजारीटोला धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले.

यासोबतच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातूनही विसर्ग वाढविल्याने नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी खंडाळा तालुक्यात लोणंदजवळचा नीरा जुना पूल आणि वाठार-वीर रस्त्यावरील वाहतूक बंद केली. २४ तासांत महाबळेश्वरला ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

वारणा नदीकाठी पूरस्थिती कायम

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर असल्याने वारणा धरणातून विसर्ग कायम आहे. त्यामुळे वारणा नदीकाठी पूरस्थिती अजूनही कायम आहे.

हेही वाचा - Rain Alert तुम्हाला माहिती आहे का पावसाचा रेड, ऑरेंज, ग्रीन, यलो अलर्ट म्हणजे काय? मग हे वाचाचं

टॅग्स :पाऊसहवामानविदर्भपुणेनाशिककोल्हापूरवादळमोसमी पाऊसमहाराष्ट्र