पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने रविवार, २८ जुलैपासून चार दिवस 'येलो अलर्ट' जारी केला आहे.
अकोला जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच रिमझिम पावसाला प्रारंभ झाला आहे. हा पाऊस पिकांना पोषक असला तरी धरणातील पूरक जलसाठ्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांपैकी अकोला, अमरावती व बुलढाणा जिल्ह्याला दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चार तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे.
९ तालुक्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोला जिल्ह्यात पावसाळ्याच्या ५५ दिवसात २५१.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, पाच जिल्ह्यात येत्या चार दिवस 'येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.