गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली असून शेतकऱ्यांसह नागरिकांचेही मोठे नुकसान केले. एकीकडे उन्हाचा असह्य कडाका वाढतच आहे.
आज दि २२ रोजी विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे.दरम्यान, मुंबई, ठाणे येथे उष्ण व आर्द्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या दक्षिण छत्तीसगडपासून तमिळनाडूपर्यंत सक्रीय असणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून विदर्भातगारपीटीसह जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या भागात यलो अलर्ट?
विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा , गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यात यलो अलर्ट असून नांदेड, परभणी, हिंगोलीतही पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूरला यलो अलर्ट देण्यात आला असून सांगलीतही पावसाची शक्यता आहे.
मुंबई ठाण्यात उष्ण व आर्द हवामान
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे या भागात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर अवकाळी पाऊसही झाला. आता पुन्हा या भागात उष्ण व आर्द्र हवामान राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.