राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपले. दरम्यान, आज विदर्भासह खान्देशात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज चक्राकार वाऱ्यांची स्थिती अफगाणीस्तानसह पूर्व इराण भागात आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा आता वायव्य दिशेने सरकत आहे. दरम्यान,आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहणार आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
आज दि १४ एप्रिल रोजी अमरावती,वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर,भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अवकाळी पावसाचा जोर ओसरत असून कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकत आहे. दरम्यान पुढील दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपीटीचे वातावरण ओसरण्याचा अंदाज देण्यात आला आहे.