Join us

Rain Alert : हवामान खात्याचा अंदाज; विदर्भात पाच तारखेपर्यंत पाऊस बरसत राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 9:28 AM

पुढील चारही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामध्ये ४ ऑगस्टपर्यंत सार्वत्रिक, तर ५ ऑगस्ट रोजी बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

वाशिम जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांनंतर मंगळवारी दुपारपर्यंत पावसाने काहीशी उसंत घेतली आणि स्वच्छ सूर्यप्रकाशही पडला. तथापि, पावसाची उघाड औटघटकेचीच ठरली आणि दुपारनंतर जिल्ह्यात पावसाने पुन्हा बस्तान मांडले.

अशातच जिल्ह्यात पुढील चारही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामध्ये ४ ऑगस्टपर्यंत सार्वत्रिक, तर ५ ऑगस्ट रोजी बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाने बुधवार, ३१ जुलै रोजी काहीशी उसंत घेतली आणि स्वच्छ सूर्यप्रकाशही पडला. दिवसभर बहुतांश भागात वातावरण निरभ्र होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले होते. तथापि, पावसाची ही उसंत औट घटकेची ठरली असून, गुरुवारी दुपारपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आणि सायंकाळच्या सुमारास पाऊसही बरसला.

सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांवर मर, मूळकुज रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. सूर्यप्रकाशाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. अशातच गुरुवारी पुन्हा पावसाने बस्तान मांडले. त्यात पुढील चारही दिवस जिल्ह्यात पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पिके हातून जाण्यार्ची भीती

जिल्ह्यात सतत पाऊस पडत असतानाच दिवसभर ढग दाटून राहत आहेत. त्यामुळे सूर्यप्रकाशाअभावी पिकांची वाढ खुंटत आहे. शिवाय शेतात पाणीही साचले असून, तण फोफावले आहे. यामुळे पिकांवर आधीच परिणाम झाला आहे. आता पुढील चार दिवस जिल्ह्यात पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. अशा वातावरणामुळे पिके हातून जाण्याची भीती वाढत आहे.

दोन दिवस येलो अलर्ट

जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा मुक्काम कायम राहण्याचे संकेत हवामान खात्याने वर्तविले असतानाच ३ ते ४ ऑगस्टपर्यंत दोन दिवसांकरिता येलो अलर्टही जारी केला आहे. अर्थात या दोन दिवसांत जिल्ह्यातील काही भागांत वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जून, जुलैमध्ये पावसाची सरासरी १२१.४० टक्के

जिल्ह्यात १ जुन ते ३१ जुलैदरम्यानच्या दोन महिन्यात ४१०.०० मि.मी. पाऊस अपेक्षीत असतो. प्रत्यक्षात यंदा या कालावधित ४९७.७० मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. हे प्रमाण जुन ते जुलैदरम्यान अपेक्षीत सरासरीच्या १२१.४० टक्के, तर पावसाळ्यातील एकूण सरासरीच्या तुलनेत ६४.०० टक्के आहे.

हेही वाचा - Rain Alert तुम्हाला माहिती आहे का पावसाचा रेड, ऑरेंज, ग्रीन, यलो अलर्ट म्हणजे काय? मग हे वाचाचं

टॅग्स :मोसमी पाऊसपाऊसहवामानविदर्भवाशिमअकोलावादळ