राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला, तरी बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळे रविवारी १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यामध्ये पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. सोमवारपासून तर तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप असणार आहे.
सध्या पावसाचा जोर कमी झाला असून, हलक्या सरी कोसळत आहेत. पुढील तीन-चार दिवसदेखील असा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. पुणे व रायगडच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकणातील पालघर, रायगड, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तसेच धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत तुरळक आहे. ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. यासोबतच पुणे परिसरात येत्या ४८ तासांमध्ये आकाश ढगाळ राहून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज देण्यात आला आहे.
कोणत्या भागांत काय अंदाज
विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटसह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात प्रामुख्याने उघडीप राहील. रविवारी रायगड, पुणे, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' हवामानशास्त्र विभागाने दिला आहे, तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.