Join us

Rain alert: राज्यात उत्तर पूर्व जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपीटीचा यलो अलर्ट, जाणून घ्या सविस्तर

By मुक्ता सरदेशमुख | Updated: April 13, 2024 09:50 IST

बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले.

राज्यात आठवडाभरापासून पावसाला पोषक वातावरण असून मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धूमाकूळ घातला आहे. अनेक भागात जोरदार पावसासह गारपीटीची हजेरी होती. दरम्यान, आजही राज्यात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊसगारपीटीची शक्यता राहणार आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील तूरळक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची व गारपीटीची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास राहणार असल्याचे सांगण्यात आले. बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. राज्यात या आठवड्यात विविध भागात पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला होता.

सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती राजस्थान , कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग आणि इशान्या बांग्लादेशावर सक्रीय आहे. परिणामी राज्यात विदर्भ मराठवाड्यासह मध्य व उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यलो अलर्ट- वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, बुलढाणा, अमरावती, अकोला, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली,बीड, परभणी,जालना, सोलापूर

टॅग्स :पाऊसगारपीटहवामानतापमान