Rain in Maharashtra मॉन्सूनचा पाऊस येत्या ३ ते ४ दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरेकडील अरबी समुद्राचा भाग, राजस्थानचा काही भाग, छत्तीसगड, बिहार आणि पश्चिम बंगालच्या काही भागात सक्रीय होण्यासाठी पोषक वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याने आज दिनांक २६ जून रोजी सकाळी ८च्या सुमारास प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हा अंदाज वर्तविला आहे. काही ठिकाणी वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कसा असेल पाऊस? आज दिनांक २६ जून पासून पुढील तीन दिवस म्हणजेच २६, २७ आणि २८ जूनपर्यंत महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे. दिनांक २६ जून रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. दररम्यान निवृत्त हवामान शास्त्रज्ञ के. एस होसाळीकर यांनी एक्सवर वर्तविलेल्या अंदाजानुसार आज कोकण किनारपट्टी भागात निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
दिनांक २७ जून रोजी कोकण गोवा, कर्नाटकातील किनारपट्टीचा भाग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात यलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भ, मध्य महाराष्ट्रात निवडक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.
दिनांक २८ जून रोजी कोकणातील निवडक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून विदर्भात निवडक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.