Rain in Marathwada: परभणी जिल्ह्यात यंदा मृग नक्षत्रापासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ७५ टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि कापूस पिके अंकुरली आहेत. या पिकांना रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकाची फवारणी करणे सुरू आहे.
त्यातच मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्यावतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवेला प्राप्त झालेल्या अंदाजानुसार ८ जुलै रोजी नांदेड, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर व परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्यांच्या वेगासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस
८ जुलै रोजी नांदेड (rain in Nanded) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळ वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्यांचा वेग अधिक राहून मुसळधार पावसाची (Heavy rain) शक्यता मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झाली आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 05 ते 11 जूलै व 12 ते 18 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात दिनांक 10 ते 16 जूलै 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : पूर्णा ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हदगाव, देगलूर, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही. तसेच मॉन्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग, खरीप ज्वारी सोडून) पेरणी करता येते, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी मौसम केंद्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.