आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला असला तरी 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात पाऊस सरासरी असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट राहणार असून वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 कि.मी. राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.
आठवड्याभरात मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम असला तरी प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या आठवड्यातील पावसाने खरिपातील पेरणी काही प्रमाणात सुधारली असली तरी ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस झाल्याने पिके धोक्यात आली आहेत. गेल्या आठवड्याभरात देशभरात मान्सूनच्या पावसाचा जोर कमी झाला असून राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून पर्जन्यमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांना पिकांचे व्यवस्थापन करावे लागणार आहे.