Join us

Rain Maharashtra Update मान्सून महाराष्ट्रात दाखल; पुढील चार आठवड्यांत कसा बरसणार पाऊस?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 9:22 AM

मृग नक्षत्राला शुक्रवारपासून सुरवात होत असली तरी नैऋत्य मान्सून आनंदसरी घेऊन गुरुवारीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळकोकण तसेच सोलापूर परिसरात या सरींनी सलामी दिली.

पुणे : मृग नक्षत्राला शुक्रवारपासून सुरवात होत असली तरी नैऋत्य मान्सून आनंदसरी घेऊन गुरुवारीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळकोकण तसेच सोलापूर परिसरात या सरींनी सलामी दिली.

मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण असून, पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये पाऊसमहाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांसह संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा भाग व्यापेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

मान्सून महाराष्ट्रात गुरुवारी दाखल झाला. अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटकाचा काही भाग, आंध्र प्रदेश किनारपट्टीचा काही भाग आणि मुंबईसह राज्यातील काही भागांत मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल आहे.

शिवाय तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि बंगालच्या उपसागरातील उर्वरित भागात ३ ते ४ दिवसांत मान्सून दाखल होईल, असे भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

गुरुवारी मान्सून रत्नागिरीत, सोलापूर, मेढक, भद्राचलम, विजयनगर व बंगालच्या खाडीपासून पुढे सरकला आहे.

पुढील तीन-चार दिवसांमध्ये मुंबईपर्यंत पाऊस धडक मारेल, शुक्रवारी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. येत्या दोन- तीन दिवसात सातारा, नाशिक, पुणे घाटमाथा परिसरात पाऊस होईल, असा अंदाज आहे.

मान्सून आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात पोहोचला आहे. मुंबई-पुण्यात काही भागात मान्सून लवकरच पोहोचेल. विदर्भात तीन-चार दिवसांमध्ये पोहोचणार आहे. सर्व ठिकाणी पोषक वातावरण तयार झाले आहे. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, माजी प्रमुख-आयएमडी, पुणे

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसमहाराष्ट्रमोसमी पावसाचा अंदाज