भारतीय हवामान विभागाने आज दिनांक १० जून २४ रोजी सकाळी साडेआठ वाजता दिलेल्या हवामान अंदाजानुसार (Rain updates) राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाचा रेड ( Monsoon red alert to Maharashtra) अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह, कोकण किनारपट्टी, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मॉन्सून कुठे पोहोचला?दरम्यान १० जून रोजी मॉन्सूनचा पाऊस मराठवाड्याच्या काही भागांत, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयातील भाग, पुणे, नगर जिल्ह्याचा काही भागात पोहोचला असून लवकरच १५ जून पर्यंत मॉन्सूनचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
सकाळी दिलेल्या अंदाजानुसार दक्षिण दिशेकडील मॉन्सूनचा प्रवास ठाणे, नगर, बीड, निझामाबाद, सुकमा या भागातून होत असून येथपर्यंत मान्सून सक्रीय होताना दिसत आहे.
रेड अलर्टआज सकाळी हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा विभागातील काही भागांत विजा आणि गारपीटीसह वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.