नैऋत्य मोसमी पाऊस जम्मू कश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडचा काही भाग, संपूर्ण पंजाब राज्य, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तरप्रदेशचा काही भाग, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान सह पश्चिम राजस्थानमधील काही भागांतून आज ३० सप्टेंबर २३ रोजी परतला असल्याचे हवामान खात्याने दुपारी दोनच्या सुमारास जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पुढील ३ ते ४ दिवसात मॉन्सून जम्मू काश्मीर, हिमाचलप्रदेश, लडाख, बाल्टीस्तान, मुझफ्फराबाद आणि उत्तराखंडच्या उर्वरित भागांतून माघारी जाण्यासाठी अनुकुल वातावरण आहे. याशिवाय पश्चिम उत्तर प्रदेश , पश्चिम मध्यप्रदेशचा काही भाग, राजस्थानचा उर्वरित भाग आणि गुजरातचा काही भाग येथून मॉन्सून माघारी जाण्यासाठी स्थिती अनुकूल झालेली आहे.
महाराष्ट्रातून दिनांक ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
राज्यातील कुठली धरणे १०० % भरली, कोठे सुरू आहे विसर्ग, जाणून घ्या
आज कोकणासाठी रेड अलर्ट
आज दिनांक ३० सप्टेंबर रोजी कोकण, गोवा आणि बिहारसाठी हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. मुंबईसह कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तर विदर्भ, मध्यमहाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्, मराठवाड्याचा काही भाग, या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागास यलो अलर्ट देण्यात आला असून येथे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
दिनांक 30 सप्टेंबर रोजी बीड, धाराशिव व लातूर जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 01 ते 04 ऑक्टोबर दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
उद्या १ ऑक्टोबर रोजी रेड अलर्ट
दिनांक १ ऑक्टोबर रोजी कोकण किनारपट्टीला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्मिम राठवाड्याचा काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून या ठिकाणी ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला असून येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दिनांक २ आणि ३ ऑक्टोबर रोजी मात्र संपूर्ण राज्यात पावसाचा कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाही. या दिवशी राज्यातील निवडक भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे.