Join us

Rain Update: राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, बहूतांश भागात ढगाळ वातावरण

By मुक्ता सरदेशमुख | Published: November 26, 2023 2:46 PM

हवामान विभागाने आज अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आज सकाळपासून हलक्या ...

हवामान विभागाने आज अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आज सकाळपासून हलक्या पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून रब्बी पिकांसाठी हा पाऊस फायद्याचा ठरू शकतो. दरम्यान, साताऱ्यासह, अहमदनगरमध्येही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

राज्यात आज मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होणार असून गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.  छत्रपती संभाजीनगर, पूणे तसेच राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता, पुढील ३-४ दिवस राज्यात पावसाचा तीव्र इशारा

समुद्री अवस्था काय?

अंदमान समुद्र आणि आजूबाजूच्या परिसरात नर्माण झालेल्या चक्राकार वारे वाहत आहेत. परिणामी कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी राज्यात बहूतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ४५ ते ५५ किमी प्रतितास राहणार आहे.

हवामान विभागाचा इशारा काय?

यासह विदर्भात अकोला, बुलढाणा चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांपुढं नवं संकट! महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळीसोबत गारपिटीची शक्यता

गारपीटीचे कारण काय?

पश्चिमेकडून येणारे थंड वारे आणि दक्षिणेतून येणाऱ्या उष्ण व बाष्पयुक्त वारे एकत्र आल्याने गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे. रविवार व सोमवार म्हणजेच 26 आणि 27 नोव्हेंबरला नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक आहे.

मराठवाड्यात कुठे होणार पाऊस?

छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.  बीड, हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवेत गारवा आहे.  साधारण तापमानाच्या तूलनेत तापमान घसरलेले आहे.

टॅग्स :पाऊसहवामानरब्बीऔरंगाबादनाशिक