Maharashtra Weather Updates : मागच्या दोन आठवड्यापासून राज्यातील सर्वच जिल्ह्यांत चांगला पाऊस बरसत आहे. तर आता या मान्सूनच्या पावसाची तीव्रता आणखी कमी होताना दिसत आहे. कालपर्यंत बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता होती. पण हवामान विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार आजपासून पुढील चार दिवस पाऊस कमी होताना दिसत असून एकाही जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला नाही.
दरम्यान, राज्यातील कोकण, पश्चिम घाट आणि विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस मागच्या दोन आठवड्यामध्ये झाला. मराठवाडा, मध्य महाराषट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची तीव्रता कमीच होती. पण येणाऱ्या चार दिवसांत सर्वच राज्यातील पावसाचा जोर ओसरत आहे.
२२ जुलैया दिवशी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील अमरावती जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात पाच जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२३ जुलैया दिवशी केवळ रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कोकणातील इतर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा वगळता कोणत्याच जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. मराठलाड्यातील एकाही जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही.तर विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
२४ जुलैया दिवशी केवळ कोकण, पश्चिम घाटमाथा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही. दरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांत सर्वांत कमी पाऊसमराठवाड्यातील हिंगोली आणि विदर्भातील नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात सर्वांत कमी पाऊस पडला होता. तर जून महिन्यात मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यांत सर्वांत कमी पाऊस पडला होता.
हवामान विभागाच्या या अंदाजावरून येणाऱ्या चार दिवसांत पावसाचा आलेख उतरता असल्याचं लक्षात येत आहे. परंतु मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पुरेसा पाऊस पडला नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यांतील पुरंदर तालुक्यात भर पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. शेतपिकांनाही विहिरीचे पाणी देण्यात येत आहे.