Maharashtra Weather Updates : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार चार जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना लागवडी आणि खरिपाच्या पेरण्या आवरून घेतल्या आहेत.
दरम्यान, १५ जूननंतर मान्सूनच्या पावसामध्ये जवळपास १५ दिवस अनेक भागांत खंड पडल्याचं चित्र होतं. पण त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने राज्यभरात चांगली हजेरी लावली. महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये मान्सूनचा चांगला पाऊस या आठवड्यामध्ये झाला. कोकण आणि सह्याद्रीच्या घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे.
कोकण किनापपट्टीलगत मागच्या आठवड्यामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेगही वाढला होता. त्यातील बाष्पाचे प्रमाणही वाढल्यामुळे कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री घाटावर चांगला पाऊस पडला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रातही सर्वदूर पाऊस झाल्याचं दिसून आलं आहे. पण राज्यातील नंदुरबार, हिंगोली, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
पुढील पाच दिवसांतही राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून मराठवाड्यामध्ये पुढील दोन दिवस म्हणजे १३ आणि १४ जुलै रोजी पावसाचे प्रमाण कमी राहील पण १५ जुलैनंतर तिथेही पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर कोकणात जोरदार, मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.