पुणे : भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यभरात हजेरी लावली आहे. मराठवाड्यासह विदर्भात मागच्या एका आठवड्यापासून विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट सुरू असून यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर आज पुणे शहरातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
पुण्यातील पाषाण, सोमेश्वरवाडी, कोथरूड, औंध, बाणेर, वारजे, सिंहगड रस्ता परिसरात पावसाने हजेरी लावली असून पुणे जिल्ह्यातील ग्राणीण भागांतही अवकाळीने हजेरी लावली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वादळ अन् सोसाट्याचा वारा सुटला असून पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे शहरातील आणि ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान
भर उन्हाळ्यातील या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला असून पावसामुळे तो खराब होण्याची शक्यता आहे. तर उन्हाळी बाजरी, मूग, भाजीपाला पिके, चारा पिके आणि अन्य पिकांचेही नुकसान होत आहे.
गारपिटीने पीके आडवी
मागच्या एका आठवड्यापासून विविध भागांत अवकाळी पाऊस सुरू आहे. सुरूवातील विदर्भातील बुलढाणा, खामगाव या परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मराठवाड्यात अवकाळीसह गारपीटीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरावरील छप्परे उडून गेली असून वीज पडून जनावरे आणि नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मोठमोठ्या गारांमुळे उभा शेतमाल आडवा झाल्याची माहिती आहे.