आठवडाभर ओढ दिल्यानंतर आता पुढील तीन ते चार दिवस मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. 17 ते 19 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनचा आस पोषक स्थितीवर येत असून कमी दाबाचा पट्टा दोन दिवसात सर्वसाधारण स्थितीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी वर्तवली आहे.
आज (16 ऑगस्ट) बुधवार रोजी नाशिक धुळे व बुलढाण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार १७ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये तर 18 व 19 ऑगस्ट रोजी हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा ताशी वेग 30 ते 40 किलोमीटर असण्याची शक्यता आहे.