मागील आठवड्यापासून पावसाने हजेरी लावल्यानंतर मराठवाड्यात आता पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनचा आस आता महाराष्ट्रातून गुजरात व आसपासच्या भागांमध्ये जाताना दिसत असून पुढील तीन ते चार दिवस मराठवाड्यात तुरळक ठिकाणीच हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठवाड्यात दिनांक 18 ते 21 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विस्तारित अंदाजानुसार 22 ते 28 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यात सरासरी एवढा ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे.
आज (दि. 18) राज्यभरात केवळ पुणे ठाणे व रायगड जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी खरीप पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार व उपलब्धतेनूसार हलके पाणी देण्याचा कृषी सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी येथील कृषी विज्ञान केंद्राने दिला आहे.