पुढील पाच दिवस महाराष्ट्रात तीव्र हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आज हा अंदाज वर्तवला.
राज्यभरात पावसाचा जोर कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्यांचा खोळंबा झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, येत्या २४ तासात मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुठे ऑरेंज अलर्ट?
रायगड, रत्नागिरीसह पुण्यात पुढील पाचही दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना येत्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
येलो अलर्ट कुठे?
अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम, कोल्हापूर , सिंधुदुर्ग, जिल्ह्यांना पुढील पाचही दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, नाशिक, जळगाव, नागपूर जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज राज्यात बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या दक्षिण झारखंड व परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात पुढील ४८ तासांमध्ये चक्राकार वारे तयार होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तवली. राज्याच्या अनेक भागात पावसाच्या सारी पडत आहेत. तर काही ठिकाणी मुसळधारांचाही अंदाज आहे. राज्यात पुढील पाच दिवस अपेक्षित तीव्र हवामानाचा अंदाज के एस होसाळीकर यांनीही ट्विट करत वर्तवला आहे.