Join us

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ४-५ दिवस पाऊस मंदावणार

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 24, 2023 7:34 PM

राज्यातील पावसाच्या उघडीपीनंतर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असला तरी पुढील चार ते पाच दिवस पाऊस ...

राज्यातील पावसाच्या उघडीपीनंतर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असला तरी पुढील चार ते पाच दिवस पाऊस मंदावणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले. आज पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज असून विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया,अमरावती, भंडारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, उर्वरित ठिकाणी जवळपास पाऊस नसल्याचे हवामान विभाग, पुण्याचे के. एस. होसाळीकर यांनी सांगितले.

उत्तर व दक्षिण कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होणार असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मराठवाड्यात तुरळक भागात हलक्या सरी कोसळतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

राज्यात बहुतांश भागात या आठवड्यात हलक्या ते मध्यम सरींचा इशारा देण्यात आला असला तरी अगदी काहीच ठिकाणी पाऊस झाल्याचे चित्र होते. औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारपर्यंत सरासरीच्या 29.6 टक्के पाऊस झाल्याचे 'महावेध' महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे. जून ते जुलैमध्ये साधारण पावसाच्या दोन टक्के अधिक पाऊस झाल्याचे सांगण्यात आले असले तरी ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पर्जन्यमानाच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या आठवडाभरापासून पावसाच्या विश्रांतीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. खरिपातील पिके कोमेजून जात असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करावे अशा सूचना पुणे हवामान विभागाने केल्या आहेत.

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजहवामानमोसमी पाऊसशेतकरीपीकमराठवाडामहाराष्ट्र