पुणे : पुणे परिसरातील अनेक भागांत पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. राज्यातील विविध ठिकाणी सध्या पावसाची रिमझिम सुरू झाली असून काही भागांत ढगाळ वातावरण आहे. आज दुपारपासून पुणे, अहमदनगर, सोलापूर या भागांत पावसाची रिमझिम सुरू झाली होती. तर कोल्हापूर परिसरात ढग दाटून आले आहेत. तर या पावसाचा काही पिकांवर वाईट परिणाम होणार असून काही पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे.
दरम्यान, काही ठिकाणी रिपरिप तर काही ठिकाणी जोराचा पाऊस पडत आहे. अहमदनगर शहरातही पाऊस सुरू असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरात काल (ता. ८) सायंकाळी पावसाची रिमझिम सुरू होती. तर मराठवाड्यातील धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यात पाऊस सुरू आहे.
आज आणि उद्या असेल पाऊस
हा पाऊस केवळ दोन दिवस असेल आणि आज पावसाची तीव्रता जास्त राहील. उद्या केवळ ढगाळ वातावरण आणि काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे. परवा कोरडे वातावरण असेल. पण यानंतर पुढचे काही दिवस धुके दाटून येऊ शकते असा अंदाज जेष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
जाणून घ्या हवामान अंदाज
आज मराठवाड्यातील परभणी, धाराशिव, जालना, हिंगोली परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसामुळे विटांचे नुकसान
पाऊस अचानक आल्यामुळे विटांचे नुकसान झाले आहे. विटा तयार करण्यासाठी कोणत्याही निवाऱ्याची सुविधा नसते आणि ढगाळ वातावरण असले तरी पाऊस येईल अशी शक्यता वाटत नव्हती. पण अचानक आलेल्या पावसामुळे जवळपास ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
- वैभव कांबळे (वीटभट्टी व्यवसायिक तरूण, कोल्हापूर)