विकास शहाशिराळा : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज (ता. पाटण, जि. सातारा) येथील पावसाने पाच हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. पर्जन्यमानात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर व वलवण या चारही अतिपावसाच्या ठिकाणांना मागे टाकले आहे.
सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज व वलवण येथे आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडला आहे. पूर्वी कोयनानगर (जि. सातारा) येथील पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद होत. मात्र, २०१९ पासून वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची नोंद होत आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना पाणलोट क्षेत्रातील नवजा, वलवण, महाबळेश्वर व पाथरपुंज या ठिकाणी पर्जन्यमापन सुरू झाल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.
अभयारण्यातील गावपाथरपुंज (ता. पाटण) हे कोयना विभागाच्या दक्षिण टोकावरील चांदोली अभयारण्यात येणारे हे गाव आहे. या ठिकाणी उच्चांकी पडणाऱ्या पावसाचे पाणी धरणातील 'वसंतसागर' जलाशयात येते. त्यामुळे चांदोली धरणातील सद्यस्थितीतील पाणीसाठा ८५ टक्के असून, जादा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा खोऱ्यातील निवळी, धनगरवाडा व पाथरपुंज हे तीन रेनगेज स्टेशन येतात. त्यातील निवळी व पाथरपुंज येथील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली आहेत. त्यामुळे पाथरपुंज येथील रहिवाशांचे पुनर्वसन रखडले आहे.
पाथरपुंज गाव आहे तरी कुठे?कोयनानगरच्या नैऋत्येला पाटण तालुक्यात पाथरपुंज हे गाव आहे. भैरवनाथ गडापासून तिकडे जाता येते. हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. विशेष म्हणजे गाव सातारा जिल्ह्यात असले तरी गावातील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली गेली आहेत. येथे पडणाºया प्रचंड पावसाचे पाणी मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची सीमारेषा ठरलेल्या वारणा नदीच्या पात्रात जाते. या नदीचा उगमही याच गावच्या पश्चिमेला आहे.
पाथरपुंज येथील गेल्या काही वर्षातील पाऊस मिलिमीटरमध्ये■ २०१४-१५ - ६,९६८■ २०१५-१६ - ४,०८०■ २०१६-१७ - ७,१७५■ २०१७-१८ - ६,२९०■ २०१८-१९ - ५,५५०■ २०१९-२० - ९,९५६■ २०२०-२१ - ६,४३३■ २०२१-२२ - ७,०२३■ २०२२-२३ - ६,९६८■ २०२३-२४ - ५,०३८ (आजअखेर)
पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा येथे होणाऱ्या पावसामुळे हे धरण भरले आहे. पाथरपुंज येथे एक जून ते ३१ जुलैअखेर ५,०३८ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. - मिलिंद किटवाडकर, उपअभियंता, चांदोली धरण