मुंबईसह कोकण किनारपट्टी, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्राचा बहुतेक भाग, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ यातील काही भागात आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर उर्वरित विदर्भ व मराठवाड्याला यलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर यलो व ऑरेंज अलर्ट असलेल्या ठिकाणी सर्वदूर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
१८ व १९ जुलैचा अंदाजभारतीय हवामान खात्याने आज दुपारी प्रसिद्ध केलेल्या बुलेटीननुसार आज दिनांक १८ जुलै व १९ रोजी कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र, तेलंगाणा, दक्षिण ओरिसा मध्ये काही ठिकाणी अतीवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी राहणार असून अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
२० व २१ जुलैला मुसळधार२० जुलै रोजी कोकण किनारपट्टी, गोवा व मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी अतीवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर विदर्भासह मध्य प्रदेशमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आज राज्यातील पाऊस
आज सकाळपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने सलामी दिली आहे. लातूर, पंढरपूर, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव येथे पावसाची संततधार सुरू आहे. मुरूडसह रायगडमधील अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. नगर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. जळगांवमधील बोदवड परिसरात तसेच बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा परिसरात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
या पावसामुळे अनेक भागात दुबार पेरणीचे संकट टळणार आहे.