सांगली जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची मागणी वाढली आहे. यामुळे सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दुसरे युनिट गुरुवारी सकाळी सुरू करून दोन हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना चालू ठेवण्यासाठी पाणी कमी पडणार नाही.
कोयना धरणातून केवळ एक हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरू होता. विसर्ग कमी असल्यामुळे सिंचन योजनांना पाणी कमी पडत होते. कृष्णा नदीवरील सिंचन योजनांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. म्हणून शेतकऱ्यांनी कोयना धरणातून गतीने व जादा पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती.
अधिक वाचा: उजनीची पाणीपातळी चिंताजनक; केवळ १७ टक्के पाणीसाठा
शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत सांगली पाटबंधारे मंडळाने गुरुवारी सकाळपासून कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दुसरे युनिट सुरू केले आहे. यामुळे कृष्णा नदीपात्रात सद्या दोन हजार १०० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. यामुळे टेंभू, ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनेसह कृष्णा नदीवरील सिंचन योजनांना पाणी कमी पडणार नाही.