सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाल्याने धरणे भरली नाहीत. प्रमुख सहा प्रकल्पांत तर ९५ टीएमसीच पाणीसाठा आहे. तर कण्हेर आणि उरमोडी धरणात ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिलेले आहे. यामुळे दुष्काळी झळा तीव्र झाल्या असून आगामी काळात संकट आणखी गहिरे होणार आहे. जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच शेती, तसेच पिण्याच्या पाण्याचे गणित अवलंबून असते.
दरवर्षी जूनपासून सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९०० मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडतो. पण, गेल्यावर्षी पावसाने दगा दिला. वार्षिक सरासरीच्या ७० टक्केच पाऊस झाला. कोणत्याही तालुक्यातील पावसाने वार्षिक सरासरीही गाठली नाही. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणेही भरली नाहीत, तर पूर्व दुष्काळी भागातील पाणी प्रकल्पातही समाधानकारक साठा झाला नाही.
त्यामुळे गेल्यावर्षी आक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी झळा वाढल्या आहेत. त्यातच आता उन्हाळा सुरू होत असल्याने टंचाईची तीव्रता वाढणार आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसी आहे. सध्या या धरणांत अवघा ९५.५१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यातील कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे.
सध्या कोयनेत ७१.२६ टीएमसीच पाणीसाठा राहिला आहे. आगामी पाच महिने हे पाणी पुरवावे लागणार आहे. तर धोम आणि तारळीत चांगला साठा असला तरी आगामी काळात पाणी मागणी वाढणार असल्याने विसर्ग करावा लागणार आहे. सध्या धोम धरणातून ७५० तर कण्हेरमधून १७५, कोयना धरणातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे.
२५ टीएमसी पाणी गतवर्षीपेक्षा कमी• जिल्ह्यातील प्रमुख धरणांत सद्य:स्थितीत ९५.५१ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक आहे.• गतवर्षी तो आतापर्यंत १२० टीएमसी इतका होता. कोयनेत ८६ टीएमसी, धोम ११.३४, कण्हेर ७.५१, उरमोडी ९.१८ आणि तारळीत पाच टीएमसीवर पाणी होते.• त्यामुळे गेल्यावर्षी पावसाळ्यापर्यंत टंचाईच्या झळा फारशा जाणवल्या नव्हत्या.
कोयनेवर तीन सिंचन योजना अवलंबून..कोयना धरणातील पाण्यावर महत्त्वाच्या तीन पाणी योजना अवलंबून आहेत. यामधील टेंभू योजनेचे पाणी साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी जाते. तर ताकारी आणि म्हैसाळ या योजना सांगली जिल्ह्यातील मोठ्या आहेत. त्यासाठीही कोयनेतील पाण्याची तरतूद आहे. ऑक्टोबरपासून वारंवार सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यातील धरण पाणीसाठा..
धरण | सध्या साठा | टक्केवारी | एकूण पाणीसाठा |
धोम | ८.९५ | ६६.२७ | १३.५० |
कण्हेर | ४,४६ | ४४.२० | १०.१० |
कोयना | ७१.२६ | ६७.७० | १०५.१५ |
बलकवडी | २.२६ | ५५.३० | ४.०८ |
उरमोडी | ४.४० | ४४.८५ | ९.९६ |
तारळी | ४.१८ | ७१.३९ | ५.८५ |