Join us

अरबी समुद्रात तेज चक्रीवादळ, मुंबई हाय अलर्टवर, हवामान विभागाचे म्हणणे काय?

By मुक्ता सरदेशमुख | Published: October 19, 2023 4:03 PM

कधी धडकणार चक्रीवादळ?

भारतीय हवामान विभागाने अरबी समुद्रात विकसित होणाऱ्या 'तेज' चक्रीवादळाचा इशारा दिल्याने मुंबई हाय अलर्टवर आहे. राज्यात एका बाजूला तापमानात कमालीची वाढ होत असून पावसाने आता देशातून माघार घेतली आहे. मान्सूननंतर तयार होणाऱ्या चक्रीवादळावर 

नक्की काय झाले?

हवामान विभागाने संभाव्य मान्सूननंतरच्या चक्रीवादळाचा संकेत दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या अग्नेय व लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्राकडे सरकला असून पुढील ४८ तासांत अरबी समुद्रावर 'तेज' नावाचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात उष्ण तापमानामुळे चक्रीवादळांच्या विकासासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा अनुकूल कालावधी आहे. 

आज चक्रीवादळाची स्थिती काय?

‘‘ दक्षिण पूर्व आणि लगतच्या दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र 19 ऑक्टोबर रोजी त्याच क्षेत्रावर कायम आहे. ते जवळजवळ पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे सरकण्याची आणि 21 ऑक्टोबर रोजी दाबामध्ये तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.’’असे मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून सांगण्यात आले.

   

कधी धडकणार चक्रीवादळ?

स्कायमेटच्या हवामान अंदाजानुसार अरबी समुद्रात वादळाची मोठी शक्यता आहे. अग्नेय अरबी आणि लगतच्या प्रदेशांवर असणारे कमी दाबाचे क्षेत्र एकवटले आहे. हे क्षेत्र किनाऱ्याहून १००० किमी अंतरावर असून अरबी समुद्राावरून  पश्चिम वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. २१ ऑक्टोबरला हा कमी दाब तीव्र होऊन त्यानंतर २४- ३६ तासांत चक्रीवादळात त्याचे रुपांतर होण्यास वाव असल्याचेही  वर्तवण्यात आले.

दरम्यान, मुंबई उपनगरात ३६.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.

हवामान विभागाने काय दिले इशारे?

  • अरबी समुद्रावर घोंगावणाऱ्या संभाव्य तेज चक्रीवादळाच्या घडामोडी लक्षात घेत भारतीय हवामान विभागाने काही इशारे दिले आहेत.
  • IMD ने मच्छिमारांना महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर २० ते २३ ऑक्टोबर दरम्यान समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 
  • पश्चिम अरबी समुद्रात २० ते २१ ऑक्टोबर पर्यंत चक्रीवादळ प्रभावी होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग वाढता असणार आहे. व त्यानंतर किनारपट्टी परिसरात ५० ते ६० किमी प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 
टॅग्स :चक्रीवादळहवामानपाऊसतापमान