मिरजगाव : भोसा खिंडीतून कुकडीच्या येणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्यावर सीना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. भोसा खिंड बोगदा झाल्यापासून प्रथमच सर्वाधिक कुकडीचे पाणी सीना धरणात आले आहे.
सीना नदी उगमस्थान, पाणलोट क्षेत्र व लाभ क्षेत्रातही यंदा पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे यावर्षी सीना धरण ओव्हरफ्लो होते की नाही, याबाबत साशंकता होती. सीना लाभक्षेत्रात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने शेतकरी हतबल झाला होता. या भागात अद्यापही जोरदार पाऊस नाही.
कुकडीचे ओव्हरफ्लो पाणी सीना धरणात सोडण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन व या भागाची परिस्थिती पाहून २९ जुलैपासून सीना धरणात भोसा खिंड बोगद्यातून कुकडीचे ओव्हरफ्लो पाणी सरासरी ४१५.२४ क्युसेकने सोडण्यात आले.
त्यावेळी सीना धरणाची पाणीपातळी मृतसाठ्याच्याही खाली होती. सीना धरणाची क्षमता २ हजार ४०० दशलक्ष घनफूट आहे. सीना धरणात ५३२ दशलक्ष घनफूट पावसाचे पाणी आले, तर भोसा खिंड बोगद्यातून कुकडीचे ओव्हरफ्लोचे १६६३७.८१ क्युसेक एवढे पाणी आले आहे.
भोसा खिंड बोगद्याच्या इतिहासात कुकडीचे सर्वाधिक पाणी २०२४ मध्ये धरणात आले आहे. २०१२ साली भोसा खिंड बोगद्यातून पहिले कुकडीचे ओव्हरफ्लोचे आवर्तन धरणात आले होते. त्यावेळी अवघे १८.०२ दशलक्ष घनफूट पाणी मिळाले होते.
सीना धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. अगोदरच धरणाच्या उजव्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे पाणी ७ सप्टेंबरपासून सीना लाभक्षेत्रातील बंधारे भरण्यासाठी सोडण्यात आले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे व बंधारे भरण्यासाठी कालव्यातून पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सीना धरण शुक्रवारी (दि.१३) रात्री एक वाजता ओव्हरफ्लो झाले. सांडव्यावरून विसर्ग ५६ क्युसेकने सुरू आहे. भोसा खिंडीतून कुकडीच्या पाण्याची आवक अद्याप सुरूच आहे. - महेश कुलकर्णी, शाखा अभियंता, सीना धरण