Join us

राज्यातील विविध ठिकाणी वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह पावसाचे थैमान!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 9:09 PM

आजही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

पुणे : राज्यातील विविध ठिकाणी मागच्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून या बिगरमोसमी किंवा पूर्वहंगामी पावसामुळे नागरिकांचे हाल होत असून शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. 

राज्यातील मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्याने हजेरी लावलीये. मान्सूनचे आगमन व्हायला अजून एका महिन्याचा कालावधी असताना या पावसाने हजेरी लावली आहे. 

दरम्यान, आज आणि काल पुणे जिल्हा आणि परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. काल दुपारी तीन वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरू होता. या पावसाने क्षणात रस्त्यांवर पाणी पाणी केले. त्याचबरोबर आज पुण्यात सायंकाळी ६ वाजता सुरू झालेला पाऊस जवळपास एक तास सुरू होता. 

तापमानही वाढलेले राज्यातील सोलापूर, जळगाव, मालेगाव, अकोला येथील पारा हा ४२ ते ४४ अंशावर जाऊन ठेपला आहे. तर किमान तापमानही वाढलेले आहे. तर दुसरीकडे पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी भांबावले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उन्हाळी पिके उभी असून या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे. 

शेतात असलेल्या भाजीपाला पिकांना आणि जनावरांसाठी असलेल्या चारा पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसू शकतो. फळबागांना आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसामुळे नुकसान होत आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपाऊस