Join us

जलसंपदा विभागाचा अजब कारभार; धरणांत पाणीसाठा नसतानाही वितरण प्रणालीची कामे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:55 IST

पुणे विभागातील नीरा-देवघर प्रकल्पात पाणीसाठा असूनही धरणातील पाण्याच्या वितरण प्रणालीची कामे प्रलंबित असल्याने पाणी मिळत नसल्याने पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

दीपक भातुसेमुंबई : पुणे विभागातील नीरा-देवघर प्रकल्पात पाणीसाठा असूनही धरणातील पाण्याच्या वितरण प्रणालीची कामे प्रलंबित असल्याने पाणी मिळत नसल्याने पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

दुसरीकडे ज्या धरणांमध्ये पाणीसाठा नाही अशा कोरड्या धरणांच्या पाणी वितरण प्रणालीची कामे मात्र मार्गी लागली आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विविध धरणांच्या पाणी वितरण प्रणालीसाठी जलसंपदा विभागाने २१ हजार १७१ कोटींहून अधिक रकमेची कामे प्रस्तावित केली आहेत.

मात्र, नीरा-देवघर प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध असूनही तेथील उजव्या कालव्याच्या वितरिकेचे काम मे २०२४ पासून टेंडर प्रक्रियेत अडकले आहे.

याउलट ज्या धरणांमध्ये जलसाठाच नाही तरीही कालव्यांच्या कामांच्या निविदा पूर्ण करून कामे वाटप केली आहेत.

पाणीसाठा नसतानाही वितरण प्रणालीची कामे सुरू असलेले प्रकल्प१) धुळे, शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे जामफळ कनोली सिंचन योजना, बंदिस्त नलिका वितरण प्रणाली कार्यारंभ ५ सप्टेंबर २०२४, किंमत ८५८.८७ कोटी २) जळगाव, बोदवड परिसर सिंचन योजना, बंदिस्त नलिका वितरण प्रणाली (२ कामे)अ) कार्यरंभ ११ ऑक्टोबर २०२४, किंमत ५८५.८० कोटी,ब) कार्यारंभ ११ ऑक्टोबर २०२४, किंमत ६४९.६२ कोटी ३) बुलढाणा, नांदुरा तालुक्यातील जिंगाव प्रकल्प, बंदिस्त नलिका वितरण प्रणाली (२ कामे)अ) कार्यारंभ १५ मार्च २०२४, किंमत १६४८.५७ कोटीब) कार्यारंभ १५ मार्च २०२४, किंमत १७७२ कोटी असे एकूण पाच ठिकाणी ५५०४.८६ कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली असताना निरा देवघर प्रकल्पात पाणी असूनही वितरण प्रणालीचे काम सुरू झालेले नाही.

मागील आठवड्यात कामाला मंजुरी दिली आहे. निधीची अडचण नाही. निविदा काढली जाणार असून, लवकरच काम सुरू होईल. - राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री 

टॅग्स :पाणीसरकारराज्य सरकारपाटबंधारे प्रकल्पशेतकरीशेतीपुणेसोलापूरराधाकृष्ण विखे पाटीलनदीधरण