मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूच नागरिकांना उन्हाचे चटके बसत होते; परंतु २९ व ३० मार्चला वातावरणात अचानक बदल झाल्याने हलक्या सरी कोसळल्या होत्या. त्यामुळे हवेत गारवा तयार होऊन उष्णता कमी झाली होती.
पण आता संपूर्ण एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. आपत्ती विभागाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, उन्हाळी हंगामात उष्मा लाटेमुळे नागरिक व पशु-प्राणी यांच्यावर उष्माघाताचा परिणाम होऊ शकतो.
त्यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने कोणत्या गोष्टी करु नये तसेच कोणती काळजी घ्यावी याबाबत प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी उष्माघाताचे लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा तसेच मदतीसाठी व आपत्कालीन परिस्थितीमध्ये १०७७, १०७०, १००, १०१, १०२, १०४, १०८ व ११२ या क्रमांकावर संपर्क करू शकता.
काय करू नये?■ उन्हात अतिकष्टाचे कामे करु नका.■ दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंडपेये घेऊ नका.■ दुपारी १२.०० ते ३.०० च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.■ उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.■ लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका.■ गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळा.■ तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा.■ उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळा, मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवा.
काय करावे?■ पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी प्या.■ घराबाहेर पडताना छत्री किंवा टोपीचा वापर करा.■ दुपारी १२.०० ते ३.०० वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.■ हलकी, पातळ व सुती कपडे वापरा.■ प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा.■ उन्हात काम करत असताना टोपी, पांढरा रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाका.■ शरीरातील पाणी कमी वाटल्यास ओ.आर.एस घ्या, घरगुती लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी घ्या.■ अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम, चक्कर येणे उन्हाचा झटका बसण्याची लक्षणे आहेत. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.■ गुरांना, पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवा व पुरेसे पाणी द्या.■ घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करा, रात्रीच्या खिडक्या उघड्या ठेवा.■ गदोदर स्त्रिया व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.