देवराष्ट्रे : ताकारी योजनेचे उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन आठ मार्चला सुरू होणार आहे. यामुळे शेती व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.
ताकारी योजनेचे हिवाळी आवर्तन तब्बल ५३ दिवस चालू होते. या माध्यमातून ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतीला मुबलक पाणीपुरवठा करण्यात आला होता.
त्यानंतर हे आवर्तन बंद करण्यात आले होते. पहिले आवर्तन बंद होऊन २० ते २५ दिवसाचा कालखंड होत आला आहे. शेती व शेती पिकांना उन्हाचा चटका वाढत असल्यामुळे पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे.
त्यातच पाऊस काळ अधिक होऊन सुद्धा विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे योजनेचे कार्यकारी अभियंता व अधिकारी यांनी योजनेचे पाणी आवर्तन सुरू करण्याचे नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे.
त्यादृष्टीने ८ मार्च रोजी पहिला टप्पा सुरू करून ताकारी योजनेचे उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन सुरू करण्यात येणार आहे.
तसेच उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन असल्यामुळे सर्व शेती पिकांना पाणीपुरवठा होईल. तोपर्यंत आवर्तन चालूच राहील.
अधिक वाचा: खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर