Tapi Water Recharge : दरवर्षी भूजल पातळी एक मीटरने खालावत असलेल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील नेपानगर, बुऱ्हाणपूर, रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांमध्ये भूजल पातळी वाढवण्यासह ३ लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. (Tapi Water Recharge)
'तापी महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पा'च्या दुसऱ्या टप्प्यामुळे दोन्ही राज्यांतील अनेक जिल्ह्यांना जलसंपत्तीचा मोठा आधार मिळणार आहे. (Tapi Water Recharge)
'या' जिल्ह्यांना मिळणार लाभ
मध्यप्रदेशातील खंडवा, नेपानगर, खगनार, बुऱ्हाणपूर या परिसरासह आणि महाराष्ट्रातील अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव यासह खान्देशमधील धारणी, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, तेल्हारा, अकोट, संग्रामपूर, जळगाव जामोद, रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. (Tapi Water Recharge)
संभाव्य पाण्याचा वाटा
महाराष्ट्र १९.३७ टीएमसीमध्यप्रदेश ११.७६ टीएमसी
हा प्रकल्प आंतरराज्यीय असल्यामुळे आंतरराज्यीय नियंत्रण मंडळाची अंतिम मान्यता मिळवावी लागणार आहे.
प्रकल्पाची अंमलबजावणी
* तापी आणि शिंपणा नदीच्या संगमावर खारिया घुटीघाट येथे प्रस्तावित डायव्हर्जन वेअर बांधला जाणार आहे.
* उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे पुराच्या पाण्याचे जलपुनर्भरण केले जाईल.
* हे पाणी मध्य प्रदेश राज्यासह महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचविले जाईल.
* बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांचाही समावेश या योजनेत आहे.
* तापी विकास महामंडळाच्या अंतर्गत हा प्रकल्प पूर्णत्वास नेला जाणार आहे.
* खारिया घुटीघाट ते अनेर धरण आणि खारिया घुटीघाट ते अचलपूर पर्यंत कालव्यांचे जाळे उभे केले जाईल.
महाराष्ट्रातील २.३४ लाख हे. क्षेत्राला लाभ
* या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील २ लाख ३४ हजार ७०६ हेक्टर आणि मध्यप्रदेशातील १ लाख २३ हजार ८२ हेक्टर क्षेत्राला थेट आणि अप्रत्यक्षरित्या सिंचनाचा फायदा होईल.
* जलस्रोत व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रकल्प दोन्ही राज्यांसाठी क्रांतिकारी ठरण्याची शक्यता आहे.
* या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सर्वेक्षण, अन्वेषण आणि प्रकल्प अहवालाला २००३ मध्ये प्राथमिक मान्यता मिळाली होती. त्यानंतर १२ मे २०१५ रोजी पहिली सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली, तर १४ मार्च २०२३ रोजी द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.