टेंभू व म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्यातून सांगोला तालुक्याच्या लाभक्षेत्रातील उन्हाळी आवर्तनाचे रोटेशन संपल्यानंतर माण व कोरडा नदीतपाणी सोडले जाणार आहे.
त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना टेंभू व म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे.
सांगोला तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी तारणहार ठरलेल्या टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व म्हैसाळ योजनेतून लाभ क्षेत्रात सध्या आवर्तन सुरू आहे.
टेंभू योजनेतून सुमारे १७ हजार हेक्टर क्षेत्र किमी ० ते ५० किमीपर्यंत कालव्याद्वारे, तर तेथून पुढे बंदिस्त नलिकेद्वारे ओलिताखाली येत आहे, तर म्हैसाळ योजनेतून सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली खाली येत आहे.
दरम्यान, टेंभू प्रकल्पात सद्यःस्थितीत पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १ मार्चपासून उन्हाळी पाण्याचे आवर्तन सुरू केले आहे.
टेंभूच्या लाभ क्षेत्रातील रोटेशन झाल्यानंतर शिल्लक पाणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नियोजन झाल्यानंतर माण नदीत सोडून खवासपूरपासून ते मेथवडेपर्यंत बंधारे भरून दिले जाणार आहेत.
तशाच प्रकारे म्हैसाळद्वारे शेतीच्या पाण्याचे रोटेशन संपल्यानंतर कोरडा नदीवरील सोनंद, जवळा, आलेगाव, मेडशिंगी बंधारे भरून दिले जाणार आहे.
नदीद्वारे पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्या.
• उन्हाची तीव्रता वाढल्याने सांगोला तालुक्यातील माण, कोरडा बेलवण नदीवरील बंधाऱ्यातील पाणी संपुष्टात येऊ लागल्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
• प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी वेळीच नियोजन करून माण व कोरडा नदीत पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
बुद्धेहाळ मध्यम प्रकल्पात ७५ टक्के पाणी
बुद्देहाळ मध्यम प्रकल्पात सुमारे ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे टेंभू योजनेतून बुद्धेहाळ तलावात पाणी सोडण्याचे सद्यःस्थितीला नियोजन नाही, असेही सांगितले जात आहे.
अधिक वाचा: शाळूच्या कडब्याला मागणी वाढली; शेकडा कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर