प्रताप महाडिक
कडेगाव : मागील वर्षी मंजूर झालेल्या तिसऱ्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार टेंभू योजना ७ हजार ३७० कोटींवर गेली आहे, तर ८० हजार हेक्टरवरून १ लाख २० हजार हेक्टर लाभक्षेत्र झाले आहे.
या योजनेवर आतापर्यंत ३ हजार ५०० कोटींचा निधी खर्च झाला आहे. तृतीय प्रकल्प अहवालानुसार योजना पूर्णत्वासाठी अजून ३ हजार ८७० कोर्टीची गरज आहे.
दरम्यान, आतापर्यंत मूळ योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले असून, या योजनेंतर्गत ७० हजार हेक्टर लाभ क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
योजनेला कृष्णा नदीतून २२.९० टीएमसी पाणी उचलण्याची मंजुरी होती. यामध्ये आता आणखी ८ टीएमसीची वाढ केली आहे. ३० टीएमसीची मंजुरी मिळाली आहे.
दुसऱ्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार सातारा, सांगली आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांतील ७ तालुक्यांतील २१ गावांतील ८० हजार हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देणारी ही योजना होती.
मात्र, आता तिसऱ्या विस्तारित सुधारित प्रकल्प अहवालानुसार १० तालुक्यांतील ३३४ गावांतील १ लाख २१ हजार ४७५ हेक्टर लाभ क्षेत्राला पाणी मिळणार आहे. १९९५ पासून सुरू असलेली कामे तब्बल २८ वर्षांनंतर दुसऱ्या सुधारित प्रकल्प मान्यतेनुसार जवळपास पूर्ण झाली आहेत.
कामाचे शेपूट वाढतेच
टेंभू योजनेचे काम १९९५ पासून सुरु झाले आहे. २८ वर्षांनंतर योजनेच काम अद्याप पूर्ण झालेले नाही. योजनेच्या कामाचे शेपूट वाढत गेले. लाभक्षेत्रात वाढ झाल्याने योजना पुढे आणखी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे योजनेला निधीची कमतरता भासू लागली. लाभ क्षेत्र वाढ गेल्याने निधीचा आकडाही वाढला.
मूळ टेंभू सिंचन योजनेची जवळपास सर्व कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, तृतीय प्रकल्प अहवालानुसार योजनेत वाढ झाली आहे. त्यानुसार विस्तारित प्रकल्पाची कामेही लवकर मार्गी लागतील. अपूर्ण कामे पूर्ण होताच पूर्ण क्षमतेने पाणी उचलले जाईल. - राजन रेड्डीयार, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन योजना, ओगलेवाडी
अधिक वाचा: म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर