आशिया खंडातील सर्वातमोठी व दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन अखेर बुधवारी सकाळी सुरू झाले. त्यामुळे कडेगाव तालुक्यासह दुष्काळी खानापूर, आटपाडी आदी तालुक्यातील टेंभूच्या आवर्तनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तर योजनेचे आवर्तन सुरू झाल्याने ५५ हजार हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांना लाभ मिळणार आहे.
या योजनेचे पाणी बुधवारी सकाळी कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर व हिंगणगाव बुद्रुक तलावात पोहोचले आहे. जिल्ह्यातील कडेगावसह खानापूर, आटपाडी आदी योजनेच्या लाभ क्षेत्रातील दुष्काळी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन केंव्हा सुटणार याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे. चालूवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यात तीव्र पाणी टंचाई भासत आहे. रब्बी पिके पाण्याअभावी कोमेजून जाऊ लागली आहेत. तर ऊस पिकांसह अन्य बागायत पिके देखील धोक्यात आली आहेत.
त्यामुळे टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती. तर याबाबत माजी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत यांनी विधानसभेत आवाज उठविला होता. आता आवर्तन सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.