राज्यात अवकाळी पावसाने विविध ठिकाणी हजेरी लावली असून तापमानाचा पारा २ ते ३ अंशांनी घसरल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान काही भागात कमाल तापमान चाळीस अंशांच्या पुढे जाताना पहायला मिळत आहे. कोकण व विदर्भ वगळता राज्याच्या उर्वरित भागात शनिवारपर्यंत मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
सातारा,सांगली जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान २७.४ तर ३७.६ अंश जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून पुण्यात ३२ ते ३६ अंशांवर तापमान जाण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये ३६ ते ४० अंश तापमान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात ४३.६, अकोला ४६.६ अंश, वाशिम ४९.५, यवतमाळ ३९.३ अंश तापमानाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाड्यात तापमानाचा पारा चढा असला तरी अवकाळी पावसाने १ ते २ अंशांची घट झाल्याचे चित्र आहे. उन्हाचा चटका काही प्रमाणात कमी झाला असला तरी आज धाराशिवमध्ये ३९.२ अंश तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४१.३ अंश तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंगोली ४०.६, जालना ३९.३, लातूर ३७.७, नांदेड ३८.९ अंश तर परभणी ३९.३ अंशांची शक्यता आहे.
कोकणात उष्ण तापमान
आज कोकण किनारपट्टीवर तापमान अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले असून रत्नागिरी ४०.३ अंश, सिंधूदूर्ग ३४.१ अंश, पालघर ४१.७, मुंबई ३९.७ अंश तापमानाची नोंद होत आहे.