राज्यात तापमानाचा भडका उडाला असून सूर्य शब्दश: आग ओकत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी (दि २४) जळगाव, अकोल्यात तापमानाचा पारा ४५.५ अंशांवर जाऊन पोहोचला होता. तर छत्रपती संभाजीनगर ४३.५४, बीड, अमरावती, वर्धा, चंद्रपूर हे जिल्ह्यांनी ४३ अंश सेल्सियसचा पारा गाठला. उष्णतेने अंगाची लाही लाही होत असून राज्यभरात आता मान्सूनची आतूरतेने वाट पाहिली जाऊ लागली आहे.
हवामान विभागाने नोंदवलेल्या तापमानानुसार, मध्य महाराष्ट्रात जळगाव व धुळे शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेची नोंद झाली असून उन्हाचा चटका असह्य होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काल सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने नोंदवले. यावेळी कमाल तापमानाचा पारा ३८ ते ४५ अंशांपर्यंत गेला होता.
पुढील पाच दिवस…
राज्यात पुढील पाच दिवसात तापमानात हळूहळू घसरण होणार असून कमाल तापमान २ ते ३ अंशांनी घटण्याचा अंदाज देण्यात आला आहे. कोकण विभागात किमान व कमाल तापमानात १ ते २ अंशांची घट होणार आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तापमान फारसा बदल जाणवणार नसून त्यानंतर २ ते ३ अंशांनी तापमान उतरणार आहे. दरम्यान आज दि २५ रोजी धुळे व जळगाव जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे.