Join us

विदर्भात दोन दिवसात तापमान घटण्याचा अंदाज; दिवस-रात्रीचा पारा सरासरीच्या वर, उकाडा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:11 AM

विदर्भात ढगाळ वातावरण निवर्तल्यानंतर थंडीचा कडाका वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या तीन दिवसात थंडी वाढण्याऐवजी उकाडा वाढल्याची जाणीव नागरिकांना होत आहे.

ढगाळ वातावरण निवर्तल्यानंतर थंडीचा कडाका वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या तीन दिवसात थंडी वाढण्याऐवजी उकाडा वाढल्याची जाणीव नागरिकांना होत आहे. दिवसाचा व रात्रीचा पारा सरासरीच्या दोन ते तीन अंशाने अधिक असून, डासांचाही त्रास वाढल्याने रात्री झोपताना पंख्याचा आधार घ्यावा लागतो आहे.

रविवारी नागपुरात दिवसाच्या तापमानात आंशिक वाढ झाली व पारा ३१.६ अंशावर पोहोचला, जो सरासरीपेक्षा २.७ अंशाने अधिक आहे. दुसरीकडे रात्रीच्या तापमानात आंशिक घट झाली असली, तरी पारा सरासरीपेक्षा ३.६ अंशाने अधिक असून, १६.२ अंशाची नोंद करण्यात आली. नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांतही तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशाने अधिक आहे. यवतमाळ शहरात सर्वाधिक कमाल तापमान ३३ अंश आणि सर्वांत कमी तापमान १५.२ अंश आहे. इतर जिल्ह्यांत किमान तापमान १६ ते १७ अंश आणि कमाल तापमान ३० ते ३२ अंशाच्या सरासरीत आहे.

दरम्यान, पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, बिहार राज्यांत तापमान विक्रमी घसरले असून, धुक्याची चादर पसरली आहे. त्याचा प्रभाव विदर्भावर कधी पडेल, याची प्रतीक्षा आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे दोन दिवस मध्य भारतात वातावरण बदलणार नाही, पण महाराष्ट्रात किमान तापमान २ ते ३ अंशाने घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी वाढेल, अशी शक्यता आहे.

गेल्यावर्षी ८ अंशावर गेला जानेवारीतील पारा

२०२१ वगळता गेल्या १० वर्षांत जानेवारी महिन्यातील तापमान सातत्याने १० अंशाच्या खाली घसरले होते. ३० जानेवारी २०१९ ला सर्वात कमी ४.६ अंश तापमानाची नोंद झाली. यासह २०१५, २०१६ व २०२० साली किमान तापमान अनुक्रमे ५.३, ५.१ व ५.७ अंश होते. गेल्यावर्षी ८ जानेवारीला सर्वांत कमी ८ अंश तापमानाची नोंद झाली, यावर्षी मात्र पंधरवडा लोटूनही पारा सरासरीच्या खाली आला नाही.

टॅग्स :तापमानहवामानविदर्भ